देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही तालुक्यातील एकमेव पीएम श्री योजनेत समाविष्ट शाळा आहे. या शाळेकडून दर्जेदार शिक्षण, स्वच्छता आणि पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र वास्तव चित्र पाहता या शाळेचा “पीएम श्री दर्जा फक्त कागदावरच” असल्याचे स्पष्ट होत आहे.


शाळेत राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार योजना अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरणात चालवली जात असल्याचे समोर आले आहे. स्वयंपाकघर, भोजन देण्याची जागा, तसेच भांडी धुण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची असून स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे.


परिणामी गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार प्रशासक म्हणून कार्य करताना दिसत नाहीत, अशी पालकांची तक्रार आहे. विविध प्रश्न विचारल्यास ते उत्तर देण्यास टाळाटाळ करतात, ज्यामुळे कारभारातील अपारदर्शकता आणि गैरजबाबदारी उघड होते.


गंभीर म्हणजे, मागील एका वर्षात एकही पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आलेला नाही, जे शिक्षक-पालक संवाद आणि सहभागाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.


गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, “अशा निष्काळजी आणि गैरजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.”


