नांदेड| सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) च्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर ३ नोव्हेंबर रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. उमेद अभियानातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सीटू च्या आंदोलनातील प्रलंबीत मागण्या तातडीने सोडवाव्यात ही मागणी देखील करण्यात आली.


उमेद अभियानाचे नायगाव तालुका व्यवस्थापक यांनी केलेल्या अपहाराची चौकशी करून त्यांच्यावर सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यापूर्वी सीटू संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणातील मागण्या सोडविण्यात याव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. उमेद अभियानामध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असून दोषींवर कारवाई होत नसल्याने निदर्शने करण्यात आली.


मौजे सोमेश्वर, वाघी ता. जि. नांदेड येथे व अर्धापूर तालुक्यातील मौजे कोंढा येथे दलित अर्जदाराना अद्याप घरकुल मिळाले नसल्यामुळे तातडीने घरकुल मंजूर करावेत ही मागणी देखील करण्यात आली. मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर हे गाव पेसा ग्रामपंचायत असून तेथे मागील ५५ वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत तेथे ग्रामसभा ठरवानुसार मागणी अर्ज केलेल्या अर्जदारांना मोफत प्लॉट्स पाडून द्यावेत व घरकुलसाठी ५ लक्ष रुपये मंजूर करावेत.



ह्या मागणीकडे देखील लक्ष वेधले कारण वझरा शेख फरीद येथील मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मागील दोन वर्षांपासून सीटू चे साखळी उपोषण सुरु असून गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर आहे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी पत्र काढले आहेत परंतु उदासीन अधिनिस्त अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सीटू जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी निदर्शने ठिकाणी केला आहे.

निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. अंबादास भंडारे, कॉ. सचिन वाहुलकर, कॉ. चंद्रकांत कांबळे, कॉ.नरसिंग माडेवार, कॉ.शिवनंदा माडेवार, कॉ. कौशल्या शिंदे, कॉ. छाया बावणे, कॉ. रुख्मिणीबाई कासराळे, कॉ. गोदावरी गोदमगावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपरोक्त मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालच्या सूचनेवरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेडचे प्रकल्प संचालक श्री संजय तुबाकले यांना देण्यात आले. श्री तुबाकले यांनी तातडीने योग्य कार्यवाही करण्यात येईल असे अश्वासन दिले.


