श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या शेख फरीद वझरा धबधब्यात रविवार दि.२ रोजी सायंकाळी मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पाच वाजता च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला व पाण्याचा जोर वाढल्याने नागपूर येथील सात पर्यटक एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष — हे धबधब्याच्या पायथ्याशी अडकले होते.


वेळ आलता पण काळ आला नसल्याने पर्यटक बालबाल बचावले
परिस्थिती गंभीर होताच, त्या ठिकाणी उपस्थित पर्यटक, गुरु रक्षक दलाचे कर्मचारी शत्रुघ्न चांदेकर तसेच स्थानिक नागरिक सय्यद इसाक, प्रदीप जोशी आणि गोपाळ गीते यांनी इतर काही लोकांना सोबत घेत प्रसंगावधान राखून मानवी साखळी तयार करत बचावकार्य हाती घेतले. सर्वांनी मिळून तातडीने या सातही पर्यटकांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



शेख फरीद वझरा परिसरातील धबधबा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओसंडून वाहत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे गर्दी करतात. तथापि, अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याच्या घटनांमुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.




