हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण यामुळे दररोज ट्रॅफिक जामची समस्या गंभीर रूप धारण करत आहे.


शहराचा मुख्य प्रवेशमार्ग असलेला परमेश्वर मंदिर कमान ते पळसपूर रस्ता, तसेच सराफा लाईन, बाजार लाईन सह इतर प्रमुख रस्त्यांवर शाळा–कॉलेज सुटण्याच्या वेळेस आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.


रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना अडथळे
वाहतुकीच्या कोंडीत अनेकदा अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका अडकत असून, वेळेत रुग्णालयात पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुकीतील तणाव आणि गोंधळामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.


अडचणीत व्यापारी आणि ग्राहक
बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असताना, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहनांना आणि पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांचे व्यवसायिक कामकाजही अडथळ्यात आले असून, ग्राहकांना खरेदीसाठी येणे-जाणे त्रासदायक ठरत आहे.


नागरिकांची नगरपंचायतीकडे मागणी
वारंवारच्या ट्रॅफिक जाममुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला तातडीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची, रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची, तसेच मुख्य चौकांवर ट्रॅफिक हवालदार आणि सिग्नल व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली आहे.
विशेषतः येथील श्री परमेश्वर मंदिरासमोरील चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थ्यांकडून होत आहे. एकूणच, शहरातील वाहतूक व्यवस्थापनातील ढिसाळपणा, अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे दिवाळीच्या सणातही हिमायतनगरकरांचा संयम सुटू लागला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


