हिमायतनगर (अनिल मादसवार) देशभरात दीपावलीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, हिमायतनगर तालुक्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने सणाचा उत्साह ओसरला. दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठ ओलांडून गेली, तर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ऐन पूजेच्या वेळी शहर अंधारात बुडाले.


सकाळपासून बाजारपेठेत फुलं, पूजासाहित्य आणि फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी आणि ग्राहकांची एकच धावपळ उडाली. ओलसर वातावरणामुळे फुलं व पूजासाहित्याचे नुकसान झाले, तर नागरिकांना पावसातून घरी पोहोचणं कठीण झालं होत.



शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंता
तालुक्यातील शेतकरी वर्गावर आधीच अतिवृष्टीचे सावट आहे. यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे निर्माण झाले असून, पिके चिखलात अडकून गुणवत्तेत घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात भाव पडले असून शेतकऱ्यांचा उत्सवाचा उत्साह मावळला आहे.


महागाईनेही शेतकऱ्यांचा गोडवा कमी केला. फराळासाठी लागणारे साहित्य महागले, फटाक्यांच्या किमती आकाशाला भिडल्या. तरीसुद्धा घरातील लेकीबाळांच्या आनंदासाठी शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने रेडिमेड कपडे, फराळ आणि दिवे घेऊन दिवाळी साजरी केली.


अंधारात पूजाअर्चा
महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे लक्ष्मीपूजनाच्या वेळी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, नागरिकांना अंधारातच पूजा करावी लागली. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरणच्या ढिसाळ कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकूणच, यंदाची दिवाळी हिमायतनगरात पावसाच्या सरींनी, विजेच्या अडचणींनी आणि शेतकऱ्यांच्या चिंतेने झाकोळली गेली.


