हिमायतनगर (प्रतिनिधी) सिरंजनी ते पळसपूर या मार्गावरील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते झाले होते. ग्रामीण भागातील हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभाग (भोकर) अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर करून मागील सहा महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली होती. मात्र प्रत्यक्ष कामाची गती अतिशय मंद असून, सदरचे काम अंदाजपत्रकाला बगल देऊन दर्जाहीन होत आहे.


सिरंजनी नजीक सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात टोळ दगड टाकून वरवर सिमेंट काँक्रेट ओतले जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे खडीकरण मजबुती न करता ठेकेदाराने काम थातुरमातुर पद्धतीने केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केला आहे. एव्हढेच नाहीतर रस्त्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर निधीचा जाणिवर्वक उल्लेख न करता ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केल्याचे दिसत आहे. या कामामुळे काही महिन्यांतच रस्ता उखडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग (भोकर) या विभागाच्या अभियंत्यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केला आहे. शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून ठेकेदार व संबंधित विभाग निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करत आहेत. नियमानुसार अनेक लेयर गायब करून “थातुर मातुर काम होते आहे. यात मजबुतीचा अभाव” असल्याचे दिसून येत असल्याने अनेक गावकऱ्यांनी ठेकेदाराला सांगूनही मंमे पद्दाथीने काम करत आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या रस्त्याच्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करून, दोषी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी. व तसेच दोषी अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करावी. आणि गुणवत्तापूर्ण काम होईपर्यंत सादर कामाचे देयके रोखावीत.


कारवाईची मागणी आणि इशारा
“जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण काम होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये. तसेच या संपूर्ण कामाची जायमोक्यावर चौकशी करावी,” यावर तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धम्मपाल मुनेश्वर, तालुकाध्यक्ष, बसपा यांनी दिला आहे.


