हदगाव, गौतम वाठोरे| दरवर्षी पुराच्या पाण्याने त्रस्त असलेल्या तामसा शहरातील नदीकाठच्या वस्त्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेली उद्भवन योजना पुन्हा सुरू करण्यासोबतच संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


ही कार्यवाही वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुकाध्यक्ष हिदायतखान पठाण तामसेकर यांनी दिलेल्या निवेदनानंतर सुरू झाली. भोई गल्ली, हनुमान मंदिर परिसर, जामा मस्जिद आणि दर्गा मोहल्ला या भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.


हिदायतखान पठाण यांनी सांगितले, “हा प्रश्न फक्त पाण्याचा नसून जनतेच्या अस्तित्वाचा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशासन हलले आणि पूरग्रस्तांच्या आक्रोशाला प्रतिसाद मिळाला. हे वंचित बहुजन आघाडीच्या संघटित शक्तीचे फलित आहे.”



पूरस्थितीचा अहवाल वेळेवर सादर करून पूरग्रस्तांच्या बाजूने भूमिका घेतल्याबद्दल तहसीलदार सुरेखा नांदे यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

हा निर्णय केवळ तामसा गावापुरता मर्यादित नसून वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवादी नेतृत्वाने लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवल्याचा ठोस पुरावा आहे. तामसा येथील जनतेने व्यक्त केलेला विश्वास आता “वंचितांची सत्ता न्यायाचा मार्ग!” या घोषणेच्या रूपाने बळकट होत आहे.

