हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात ऊस लागवडीत कामारी पहिल्या क्रमांकावर आणि वाघी परिसरातील शेतकरी दुसऱ्या क्रमांकावर उत्पादन घेत असल्याचे चित्र आहे. मात्र तालुक्यातील दोन्ही कारखान्यांकडून ऊसाचा हंगामी दर अजूनही जाहीर न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.


वागलवाडा कारखाना आणि सुभाष शुगर या दोन्ही कारखान्यांनी मोळी पूजनाची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अधिकृत भाव जाहीर करण्यात आलेला नाही.


या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संभाजीराव माने (वाघीकर) यांनी ऊसाला किमान ३,००० रुपये प्रतिटन दर तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.


उसाचे दर न जाहीर झाल्याने पेरणी, कापणी व वाहतूक नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शेतकऱ्यांचा इशारा आहे की योग्य दर न मिळाल्यास पुढील आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागू शकतो.



