नांदेड| जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणातून 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता 3,06,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. हे पाणी साधारण 36–40 तासांमध्ये शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पात पोहोचेल, त्यामुळे अंदाजे 30 सप्टेंबर रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 3,50,000 क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे.


सद्यस्थितीत शंकररावजी चव्हाण प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडले असून 2,34,732 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रातील नांदेड जुना पूल येथे सध्याची पाणी पातळी 351.94 मीटर असून, इशारा पातळी 351.00 मीटर आहे. अंदाजे नांदेड शहराची धोका पातळी 354.00 मीटर ओलांडून 354.25 मीटर पर्यंत पोहचू शकते.


तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत आवक 3,95,000 क्युसेक्स असून विसर्ग 3,34,231 क्युसेक्स नदीपात्रात सोडला जात आहे. प्रशासनाने धोका लक्षात घेऊन शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या नदीकाठच्या गावांमध्ये रहिवाशांना सतर्क राहण्याचे, नदीपात्रात कुणीही जाण्याचे टाळण्याचे आणि वाहने, जनावरे, पाळीव प्राणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. गावकऱ्यांना हे सूचना तहसिलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक देणार आहेत.




