देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या आणि पीएम.ओ. (पॅनेल मॉडेल स्कूल) म्हणून निवड झालेल्या शहापूर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तब्बल १२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने शिक्षक व सेवकांची भरती करावी, अशी मागणी बालाजी कनकटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


🔹 शाळेचा इतिहास व यश
शहापूर हायस्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले असून डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, पायलट यांसारख्या पदांवर माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या शाळेने राज्यासह पश्चिम बंगालमध्ये आपला डंका वाजवला आहे. या कामगिरीमुळेच शाळेला पीएम.ओ. शाळेचा दर्जा प्राप्त झाला.


🔹 सध्याची गंभीर परिस्थिती
शाळेत तब्बल १२ शिक्षकांची पदे रिक्त असून, त्यापैकी ३ सेवकांची पदेही रिक्त आहेत.आजघडीला एकही सेवक नाही. त्यामुळे विद्यार्थी स्वतः वर्गात शिकण्याऐवजी झाडू हातात घेऊन साफसफाई करत आहेत. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण कोसो दूर जात आहे


🔹 बालाजी कनकटे यांची मागणी
“शिक्षण विभागाचा कारभार सध्या उंटावर बसून शेळ्या हाकण्यासारखा सुरू आहे. जिथे मुले आहेत तिथे शिक्षक नाहीत, आणि जिथे शिक्षक आहेत तिथे विद्यार्थी नाहीत. वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून शहापूर शाळेत शिक्षक व सेवकांची भरती करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,” असे निवेदनात नमूद केले आहे. या समस्येवर जिल्हा परिषद प्रशासन तातडीने कार्यवाही करणार का, याकडे शहापूरवासीयांचे डोळे लागले आहेत.



