नांदेड l महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून, शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.


शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व उपाययोजनांबाबत चर्चा झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ५५३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी नुकसानाची तीव्रता पाहता वाढीव मदतीची आवश्यकता असल्याचे खा. अशोकराव चव्हाण याप्रसंगी म्हणाले.


तेलंगणातील पोचमपाड बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. अतिवृष्टी झाल्यानंतर पोचमपाड प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये वाढ होऊन शेती जमिनीखाली जाते. जिल्ह्यात इतरत्रही अशीच परिस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर आणि बॅकवॉटर असा तिहेरी फटका बसतो आहे. या पार्श्वभूमिवर पूररेषेत बदल करण्याची गरज आहे. प्रशासनाने नवीन पूररेषा निश्चित करून पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचा शेतकऱ्यांना एकरकमी मावेजा देण्यात यावा, असे खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.




