देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक गावांमध्ये घरे, धान्यसाठा व जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी न करता तालुक्यातून निघून गेल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली असून त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.


तेलंगणातील निझामसागर धरणाच्या कामारेड्डी परिसरात ढगफुटी झाल्याने धरणाचे तब्बल २७ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वाझरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊन नदीकाठच्या गावात पाणी शिरले. परिणामी शेतीचे अतोनात नुकसान झाले, तर अनेक घरातील अन्नधान्य व साहित्य पाण्यात भिजून नष्ट झाले.

याशिवाय कंधार तालुक्यात रेकॉर्डब्रेक २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने ते पाणी देगलूर तालुक्यातील १०-१२ गावात शिरले. त्यामुळे पिके पूर्णपणे भुईसपाट झाली, घरांची व जनावरांची हानी झाली. या संकटात शहापूर, नरगल व देगलूर येथे पूरग्रस्तांसाठी गणेश मंडळांच्या व दानशूरांच्या वतीने नाश्ता, जेवण व निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी थोडे समाधान व्यक्त केले आहे.


तरीदेखील पालकमंत्र्यांनी या भागाची दखल न घेतल्याने जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. “पूरग्रस्त भागातील सर्वच तालुक्यांना भेट दिली जाऊ शकते, मग देगलूर का वगळला जातो? देगलूर तालुका कश्मीर आहे का? येथील जनता नाही का?” असा सवाल शेतकरी व नागरिक करत आहेत.

शेतकरी म्हणतात की, लोकप्रतिनिधी केवळ पाहणीपुरते येतात, पण प्रत्यक्ष भरपाई केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालकमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याऐवजी केवळ औपचारिक कार्यक्रम व ध्वजारोहणापुरते मर्यादित असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

