नांदेड/देगलूर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील मेदनकल्लूर या गावामध्ये 8 लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. दिनांक 27 ऑगस्टपासून निजामसागर धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्याचा फटका देगलूर तालुक्यामधील तमलूर, मेदनकल्लूर, उमर सांगवी या गावांना बसला. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत 27 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले होते.


मेदनकल्लूर गावांमधील 8 व्यक्तींना प्रशासनामार्फत वेळोवेळी संपर्क साधून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन केले होते. तरी देखील संबंधित व्यक्ती गावामधून बाहेर पडले नाहीत. 28 ऑगस्ट रोजी प्रशासना मार्फत संबंधित व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी गेले असता संबंधित व्यक्ती पळून जाऊन गावामध्ये लपून बसले.

परंतु पाण्याचा प्रवाह वाढतच राहिल्याने प्रशासनाने काल 29 ऑगस्ट 2025 रोजी एसडीआरएफ टीमच्या मदतीने संबंधित सिद्धी आनवर देसाई, सिद्धी असलम देसाई, सिद्धी मुक्रम देसाई, सिद्धी शाकीर सिद्धी मूनतान देसाई, पाशा देसाई, सिद्धी शरीफ देसाई, बागवानिन अमीन खान, मुमताज अमुजामी यांना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी प्रशासनामार्फत देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



