
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी प्रभाताई रघुनाथ मिराशे, गजानन विठ्ठल मिराशे व कविता गजानन मिराशे हे गुरुवारी शेतात मुग तोडण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस व वीजांचा कडकडाट सुरू झाल्याने तिघेही झोपडीमध्ये आसरा घेत होते. यावेळी अचानक विजांचा कडकडाट झाला. दरम्यान प्रभाताई मिराशे व गजानन मिराशे हे झोपडीबाहेर असताना विजेचा जबर धक्का बसून दोघेही जागेवर कोसळले.


गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन मिराशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टाके घालावे लागले आहेत. तर प्रभाताई मिराशे यांच्या साडीला आग लागून पाय व हाताला जबर दुखापत झाली आहे. गंभीर परिस्थिती असूनही दोघेही मृत्यूच्या दाढेतून बचावले. दोन वर्षांपूर्वी याच शिवारात विजेचा आघात होऊन वडिलांचा मृत्यू झाला होता. “आज पुन्हा मुलावर तीच परिस्थिती आली होती, पण दैव बलवत्तर म्हणून वाचलो,” अशी भावना जखमींनी व्यक्त केली.

या घटनेनंतर पिचोंडी व परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरु होता. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याने पुन्हा चार दिवस अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे समजल्याने हिमायतनगर तालुका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




