हिमायतनगर, अनिल मादसवार| पूरग्रस्त भागात येणाऱ्या मौजे सिरपल्ली गावातील एक गर्भवती महिलेला बोट च्या सहाय्याने सुखरूप बाहेर आणले आहे. सदर गर्भवती महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम आणि महसूल विभागाची टीम कार्यरत आहे.



मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी व इसापूर धरणाच्या विसर्गामुळे शिरपल्ली व डोल्हारी गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ते व पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रशासनाला या गावात पोहोचणे अशक्य झाले होते. आज दिनांक २१ रोजी हादगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार एच. जी. पठाण यांच्या पुढाकारातून महसूल विभाग व वैद्यकीय पथकाने बोटीच्या सहाय्याने या गावात प्रवेश केला. गावात पोहोचताच पथकाने तात्काळ आरोग्य सेवा सुरू केली. लहान मुले, वृद्ध व रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गंभीर रुग्ण आढळले नाहीत.



यावेळी मौजे शिरपल्ली येथील एका गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर येथे दाखल करण्यात आले. या मोहिमेत नायब तहसीलदार एच. जी. पठाण, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सब्बनवार, डॉक्टर प्रताप परभनकर, डॉक्टर गोविंद वानखेडे, आशा वर्कर कांताबाई तपासकर, पोलीस पाटील योगेश आलेवाड, कर्मचारी हरीश गिरी, वाहनचालक आकाश बारकुल व बोट चालक रवी अंभोरे यांनी परिश्रम घेतले. १५ ऑगस्टपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. काल प्रतिकूल हवामानामुळे पथकाला प्रवेश करता आला नव्हता, मात्र आज सकाळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे मनःपूर्वक स्वागत केले.





