यवतमाळ/नांदेड, अनिल मादसवार| गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसासह इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बोरीच्या जुन्या पुलावरून वेगवान प्रवाह सुरू असून, परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने ऊस, सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.



कयाधू नदीचे पाणी पैनगंगेत मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून ढाणकी मार्गे विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. हिमायतनगर व उमरखेड तालुक्यातील घारापुर, कामारी, विरसनी, दिघी, चाथरी, बोरी, देवसरी, कोपरा, पळसपुर, डोलारी, सिरपल्ली, कोठा, धानोरा, एकंबा, सावळेश्वर, बोरगडी, वारंगटाकळी आदी परिसरातील शेतीपिकांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला तर गावांलागत पाणी आल्याने गावातील घरातही पाणी शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इसापूर धरणाचा विसर्ग कायम राहिला आणि पावसाची तीव्रता वाढली, तर या गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आहे.



याबाबत राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते चक्रधर पाटील देवसरकर यांनी संताप व्यक्त करत, “धरण विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत,” असा आरोप केला. तसेच, या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट मदत आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा नदीकाठच्या शेतकऱ्यांना घेऊन जनआंदोलन उभारू असा इशारा नांदेड न्यूज लाइव्हच्या मधुमातून दिला आहे.




