नांदेड| जिल्ह्यातील नरसी येथून जवळच असलेल्या किन्हाळा (ता. बिलोली) येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करावे असे आवाहन नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.


रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी किन्हाळा येथे आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.


रविवारी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व लगेच साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी शिक्षणाशिवाय आपला उद्धार होणार नसल्याचे सांगितले. आपल्या घरात फक्त कारकून व शिपाई तयार न होता आएएएस, आयपीएस अधिकारी तयार झाले पाहिजेत याची दक्षता माता भगिनींनी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.


मतांची चोरी करुन सत्तेवर आलेले सरकार जनतेची कामे कधीही करणार नाही, केली तर फक्त लूट करणार हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. राज्यात सामाजिक अन्याय अत्त्याचार वाढले आहेत, कितीही आंदोलने केली तरी आरक्षणाचे वर्गीकरण केले जात नाही. यासाठी या भ्रष्ट सरकारला घरी बसऊन आपण किंवा आपली माणसे सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी समदुःखी बहुजन समाजाला संघटित करावे लागेल असेही विचार शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नायगांव तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे, लोकस्वराज्य आंदोलनचे देविदास सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. टी. एम. वाघमारे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. तांदळीकर सर यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी केले.


