नांदेड l दिव्यांग शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये खोटे कागदपत्रे जोडून पात्रता नसतानाही संस्था चालक व मुख्याध्यापकांनी नौकर भरती केली आहे या भरतीची त्वरित चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका निवेदनद्वारे केली आहे.


सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग शाळा आहेत या शाळेमध्ये संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना व खोटे कागदपत्रे जोडून आपल्या जवळचे नातेवाईक नौकरीला लावले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय झाला आहे.


परीणामी दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष शिक्षकांची भरती करते वेळेस इतर शाळेतील सामान्य शिक्षक यांना टीचर एलिजीबिलिटी टेस्ट अनिवार्य आहे त्याच प्रकारे दिव्यांग शाळेतील सर्व प्रकारच्या विशेष शिक्षक आणि निम वैद्यकीय कर्मचारी यांच्या भरतीसाठी एलिजिबिलिटि टेस्ट तात्काळ लागू करणे. त्यासाठी वेगळी समिती निर्माण करण्यात यावी.


नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग शाळेत आर.सी.आय. नोंदणी करत आणि दिव्यांग शाळा संहितेप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असतांना सुद्धा खोटी कागदपत्रे लावून कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या मुख्याध्यापक, संस्था चालक आणि अधिकारी यांच्यावर भारतीय पुनर्वास परिषद 1992 अधिनियम अनुसार दिव्यांगांचे हक्क व न्यायापासून वंचित ठेवल्याने गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे.

तसेच कर्मचाऱ्यांची नियमबाह्यपणे भरती करून सदरील कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत उचलण्यात आलेला पगार संस्थाचालक, अधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्याकडून वसूल करून शासनास परत करण्यात यावे, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील 18/8/2004 च्या आकृतीबंधानुसार व्यपगत झालेल्या पदावर नियम बाह्यपणे शासनाची फसवणूक करून दिव्यांग शाळेत समायोजन करून नेमणुकी करण्यात आलेल्या आहेत.
संबंधित दोशी कर्मचारी यांनी संस्थाचालक आणि अधिकारी यांना लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण करून हा गंभीर प्रकार जाणीवपूर्वक घडून आणला आहे. अशा संबंधित सर्व दोषी कर्मचारी, संस्थाचालक आणि अधिकारी यांच्यावर गंभीर कारवाई करून आतापर्यंत लाखोंच्या वर उचललेला पगार तात्काळ कर्मचारी आणि संस्थेकडून वसूल करून शासनाच्या तिजोरीत तात्काळ परत करण्यात यावे.
पूर्ण वसुली होईपर्यंत त्यांचा पगार तात्काळ बंद करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे.चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील,सकल दिव्यांग संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे, पत्रकार भैय्यासाहेब गोडबोले, कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने . नागेश निरडी यांनी निवेदनाद्वारे दिव्यांग मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री मुख्य सचिव. दिव्यांग कल्याण सचिव. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभागीय आयुक्त, समाज कल्याण आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे.
पुढील चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने 9 ऑगस्ट व 15 ऑगस्ट 2025 रोजी आक्रोश मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.


