किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांड्यातील अल्पभूधारक शेतकर्याने त्यांच्याच शेतातील विहिरीचा मुरुम त्याच शेती सुधारण्याच्या कामावर वापरत असतांना महसूलच्या पथकाने मुरुमासह दोन ट्रॅक्टर्स ७ जून रोजी पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. मुरुमाचे अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक करणार्यांना अभय दिल्या जाते. तर शेतकर्यांच्या शेती सुधार कामावरच्या वैध मुरुमाचे ट्रॅक्टर्स धरले जातात. तहसिलदारांनी दिलेल्या उद्दीष्ठ्य पूर्ण करण्याच्या नादात शेतकर्याची बाजू ऐकून न घेता महसूल पथकाने कारवाई केली. मुरुमच अवैध होता तर या अवैध कारवाईचा महसुल प्रशासनाला जबाब तर द्यावाच लागणार असल्याचे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.


तहसिलदार शारदा चौंडेकरांनी महसूल यंत्रणेला गौण, खनिज, रेती, मुरुमाच्या अवैध व्यवसायिकांकडून वार्षिक उद्दीष्ठ्य निश्चीत करुन दिल्याची सबब या कारवाई दरम्यान कर्मचार्यांनी बोलून दाखवली. ७ जून रोजी बेंदीतांडा गावालगतच्या शेत गट क्र.२१/क, दुधराम गोबरा पवार या अल्पभूधारक शेतकर्याच्या शेतात शेती सुधारणेची कामे चालू होती.


शेतात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी त्याच शेतातील विहिरीचा मुरुम त्याच शेतात जेसीबीने दोन ट्रॅक्टर्स भरुन वाहतूक करीत होते. दरम्यान मंडळ अधिकारी दंतुलवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने पकडून तहसिल कार्यालयात आणून लावलेत. शासन जीआरमध्ये शेती सुधारणेसाठी त्याच शेतातील दगड, माती, मुरुम वगैरे मटेरीयल उपयोगात आणण्यासाठी स्वामित्वधन आकारणी करता येत नसल्याची नोंद असतांनाही तहसिलची वेगळी परवानगी काढली नसल्याची पथकाने शक्कल लढवून दोन ट्रॅक्टर्स जप्त केलीत.


दिनांक 11 पर्यंत या प्रकरणी कुठलाही पंचनामा सादर करण्यात आलेला नव्हता. पाच-पाच दिवस स्थळपंचनामा दाखल न करण्यामागची गोम काय ?, शेत गट क्र.२१/क मधिलच स्थळ पंचनामा असेल यावर शंका येणे स्वाभाविक असल्याची चर्चा होवू लागलीय. बाहेर वाहतूक करतांना ट्रॅक्टर्स धरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्या शेतकर्यांकडे सर्व छायाचित्रे उपलब्ध असल्याने कदाचित पथकाची गोची होऊ शकेल असा अनुमान आहे. त्याच शेतीला लागून नायब तहसिलदारांचे शेत असून जवळपास दिडशे ब्रास मुरुम त्यांच्याही शेतात शेती सुधारणेकामी वापरल्याचे सांगण्यात आले. पथकातील कांहींचे घरबांधकाम चालु असून त्या घरासाठी वापरलेल्या शंभर ट्रॅक्टर मुरुमाच्याही राॅयल्टीचा प्रश्न पुढे येणार असल्याचे समजते.



