नांदेड l सामाजिक कार्यकर्ते, लेखक व कवी आदित्य बालाजीराव भांगे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या युजीसी नेट परीक्षेच्या निकालात यश मिळविले आहे, उच्च शिक्षण क्षेत्रातील ही कठीण समजली जाणारी पात्रता परीक्षा त्यांनी उत्तीर्ण करून स्वतःच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.


मूळचे बहाद्दरपूरा (ता.कंधार) येथील असलेले भांगे सध्या नांदेडमध्ये वास्तव्यास असून विविध सामाजिक आणि साहित्यिक चळवळीशी संबंधित आहेत. नेट-सेट-पीएच.डी धारक संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून ते कार्य करीत असताना सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेतील अन्याया विरोधात त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये पुढाकार घेतला आह. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात तासिका तत्वावर अध्यापन सुरू केले.आता युजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे.


या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी,आणि कुटुंबीयांचे सहकार्य असल्याचे भांगे यांनी सांगितले. विशेषत भाऊजी अमित पाटसकर (एएसओ), प्रा.साईनाथ शेटोड आणि प्रा.परमेश्वर पौळ यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या यशाबद्दल विविध साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच मित्रांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




