Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

images Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

नांदेड| अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या नेमक्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश पडेल, असे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज सांगितले. राज्यसभेत खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरक प्रश्नाद्वारे अहमदाबाद-लंडन विमानाच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत खा. अशोक चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. विमानाचे दोन्ही इंजिने बंद होण्यामागील नेमके कारण काय आणि त्याकरिता विमान उत्पादक कंपनी, इंजिन निर्माती कंपनी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स भाग बसवणाऱ्या कंपनीला काही निर्देश देण्यात आले आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली.

यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, या अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तसेच नियमबद्ध आणि निष्पक्षपणे सुरु आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डीकोडिंगसाठी परदेशात न पाठवता प्रथमच भारतात तपासण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अंतिम अहवाला नंतरच या अपघाताच्या कारणांबाबत स्पष्टता येईल. देश-विदेशातील प्रसारमाध्यमांनी या अपघाताबाबत विविध निष्कर्ष आणि अटकळी मांडल्या आहेत. मात्र, हा तपास कोणत्याही अटकळींवर नव्हे, तर केवळ तथ्यांवर आधारित आहे. आमचे उद्दिष्ट सत्य शोधणे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरी उड्डयन महासंचालनालयातील मंजूर पदांपैकी ५० टक्के जागा रिक्त असल्याकडे खा. अशोक चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना नायडू म्हणाले की, मागील दहा वर्षांत भारतीय हवाई सेवेचा प्रचंड वेगाने विस्तार झाला आहे. प्रवाशांची संख्या, विमाने आणि विमानतळ यांची संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी उड्डयन महासंचालनालयातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षी १०३ पदांची भरती करण्यात आली, जी या यंत्रणेच्या इतिहासातील एका वर्षातील सर्वात मोठी भरती होती. यंदा १९० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top