हिमायतनगर/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथे वृत्तसंकल करण्यासाठी गेलेले डिजिटल मीडिया परिषदेचे पत्रकार गजानन जिद्देवार यांना मारहाण करून दादागिरी करणाऱ्या रेती माफियाला तात्काळ अटक करण्यात यावी. आणि त्यांचे भ्रमणध्वनी वरील कॉल डिटेलचे CDR काढुन त्यांना सहकार्य केलेल्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आष्टी ता. हदगांव येथील पत्रकार गजानन जिद्देवार यांचेवर हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथील वाळु माफीयांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हि बाब लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे मनोधैर्य, हिम्मत खचवनारी निंदनीय घटना आहे. यातील आरोपी असलेल्याने राजकीय पदाचा गैरवापर करून महसूल अधिकारी यांना हाताशी धरून शासनाच्या गौण खनिजाची चोरी करून साठेबाजी केली होती. हा प्रकार पत्रकार जिद्देवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरसनी, कामारी, पिंपरी परिसरातील अवैद्य रेती साठे जप्त करून त्या साठ्यातील रेती गोरगरीब घरकुल लाभार्थी यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत वाटप करण्याची मागणी केली होती.



त्यांच्या तक्रारीची दाखल घेऊन महसूलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी रेती साठे जप्त करून त्याचा लिलाव आणि घरकुल धारकांना वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची माहिती मिळाल्यावरून आष्टी ता. हदगांव येथील पत्रकार गजानन जिद्देवार हे वृत्तसंकलन करण्यासाठी विरसनी येथे गेले होते. यावेळी त्यांनी ते अवैद्य रेती साठ्याचे फोटो व व्हिडीओ फुटेज घेत असताना आरोपी शेख अफरोज, सोनू देवसरकर आणि त्याचे साथीदार यांनी संगनमत करून रेतीसाठ्याची तक्रार देणारा तूच पत्रकार आहेस का..? आमच्या तालुक्यात येऊन शहाणपणा करतो का असे म्हणत लाथा बुकय्या, लाठ्या काठ्याने बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत ट्रैक्टर अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच जिद्देवार यांचे दोन मोबाईल फोडून नुकसान केले होते.


यावरून पोलिसांनी गुन्हा दखल केला असला तरी अद्याप त्या रेतीमाफिया आरोपीना अटक न करता अटक पूर्व जामिनासाठी मोकाट सोडले आहे. त्यामुळे रेतीमाफिया आरोपी यांना राजकीय नेत्यांचे आणि पोलिसांचे अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. रेती माफिया आरोपी काहीं लोकाच्या संपर्कात राहुन रेती साठे करणे याबरोबर तक्रार करणाऱ्या पत्रकारास मारण्याचा कट रचत होते. तेंव्हा आरोपींच्या मोबाईलचे CDR काढून संबंधीताचा गुन्ह्यात समावेश करुन त्यांना सहकार्य करणार्यांना सहआरोपी करावे. अन्यथा पत्रकारासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव कल्याणकर (देशमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी दिला आहे. त्यांनी या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड, तहसीलदार हिमायतनगर यांना दिल्या आहेत.



