Sunday, May 17

Ashok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

नांदेड/ वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पुढील पाच दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आहे. खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी आज अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी अवगत केले.

यावेळी हदगावचे आ. बाबुराव कोहळीकर तसेच महसूल, कृषी, वीज आदी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विमा कंपनीचे प्रतिनिधी देखील देखील उपस्थित होते. पंचनामे वेगाने पूर्ण व्हावेत यासाठी ड्रोनचा जास्तीत जास्त वापर करण्याची सूचना खा. अशोकराव चव्हाण यांनी महसूल प्रशासनाला केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना स्वीकारून संबंधित कर्मचाऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या नुकसानाबाबत ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने दिलेली माहिती विमा कंपनीने स्वीकारावी. या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले, त्यांना भरपाई देण्याबाबत कार्यवाही सुरू करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

फोन उचला, तक्रारी ऐकून घ्या! वीज अधिकार्‍यांना सुनावले खडे बोल

दोन दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब झुकले असून, तारा तुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. वीज विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देताना खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण दोघांनीही वीज विभागाच्या संथगती कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. दुरुस्ती होईल तेव्हा होईल, मात्र तक्रारीसाठी येणारे ग्राहकांचे फोन उचला आणि त्यांना प्रतिसाद द्या, असे खडे बोल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. डीपी बदलल्यानंतरही बिघाड कायम राहत असल्याने पंधरा दिवसात पाच-पाच वेळा डीपी बदलाव्या लागत असल्याची बाब आमदार श्रीजया चव्हाण यांनी या बैठकीत मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!