नांदेड, प्रतिनिधी| दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार नांदेड विभागात रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकांवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. १३ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ४७ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करून ३६ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील स्वच्छता राखणे, अनधिकृत व्यावसायिक हालचालींना आळा घालणे आणि प्रवाशांना सुरक्षित व त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देणे, हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता.


अनेक रेल्वे मार्गांवर अचानक तपासणी – नांदेड विभागातील मनमाड–जालना, पूर्णा–अकोला, नांदेड–पूर्णा, पूर्णा–छत्रपती संभाजीनगर, मुदखेड–छत्रपती संभाजीनगर, पूर्णा–वाशीम, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–परळी वैजनाथ या रेल्वे मार्गांवर ही मोहीम राबविण्यात आली.
रेल्वेगाड्या तसेच स्थानक परिसरात अनधिकृत फेरीविक्रीमुळे प्रवाशांना गैरसोय होण्यासोबतच स्वच्छता आणि प्रवाशांच्या सुरळीत हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. अनधिकृत फेरीविक्रीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नांदेड रेल्वे विभागाकडून अशा अचानक तपासण्या व विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.


रेल्वे प्रवाशांनी खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची खरेदी केवळ अधिकृत रेल्वे विक्रेते, कॅन्टीन आणि स्टॉल्समधूनच करावी. अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही बाब आढळल्यास रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.



