हिमायतनगर| शहरातील बुधवारच्या आठवडी बाजारात खत – बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नामदेव मद्दे हे करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील आठवडी बाजारात आगामी खरीप हंगामासाठी खत, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. याचं संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शहरातील कृषी दुकानावर आलेल्या शेतकरी रामदास उत्तमराव हनवते, वारंगटाकळी यांच्या हातातली 50 हजारांची रक्कम असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी व बाजारातील लोकांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून चोरट्याला पकडून त्यांचेकडून 30 हजार परत घेतली. तर उर्वरित 20 हजार अन्य कुणाजवळ तरी चोरट्याने देऊन लंपास केले. तसेच या शेतकऱ्याचा साक्षीदारांचे देखील 10 हजार रुपये चोरट्याने लंपास केले आहे.


नागरिकांनी सदर चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलीस खाक्या दाखविताच चोरट्याने आपले नाव प्रीतम दशरथ चव्हाण, रा वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना असल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्याने दिलेल्या फियादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 कलम 309 (4), 303 (2), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कृषी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे या चोरट्याने रक्कम कोणाजवळ देऊन लांबविली त्या दिशेने तपास केला जात असून, चोरट्यांची टोळी शहरात दाखल झाली असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नामदेव मद्दे व त्यांचे सहकारी करत आहेत.


चोरीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी जनतेला व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैंकेत व्यवहार करताना, दुकानात खरेदी व बाजार करताना सतर्कता बाळगावी. शक्यतोवर रक्कम व्यवस्थित सांभाळावी जेणेकरून चॊरीच्या घटना घडणार नाहीत असे कुठे घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आमचे पोलीस कर्तव्यात तयार आहेत असेही ते म्हणाले.

