लोहा/नांदेड| या भागातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. लोहा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका ते दोन वर्षापासून रिक्त असून, प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणायचं काय? असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होतो.



लोहा शहर व शंभरच्यावर ग्रामपंचायतीचा समावेश लोहा तालुक्यात आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय पारडी येथे स्थापन आहे. परंतु मागील एक ते दोन वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस ते लोहा येथे उपस्थित राहतात. लोहा येथील कृषी कार्यालयात मोठा कर्मचाऱ्यांचा स्टॉफ आहे. परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याने कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. राज्य शासनाच्या अनेक कृषीच्या योजना आहेत. उपक्रम राबविणाऱ्या प्रमुख तालुका पातळीच्या अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी अधिकारी का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे. मार्गदर्शन मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी मिळून येत नसल्याने शेतकरी वर्गात संतप्त झाला आहे. कृषी खात्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी एकाच वेळेस कार्यालयातून गायब असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली तेंव्हा कार्यालयात डीकळे (शिपाई) एस. व्ही. उपलवाड, सुपरवाजर हे उपस्थित होते. ईतर कोणताही कर्मचारी यांना वेळेचे बंधन नाही. मुख्य म्हणजे या कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी हेच अनुपस्थित रहातात.



लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची वेळ सकाळी १० वाजता सुरू होते. मात्र, अधिकारी कर्मचारी १२ वाजेपर्यंतही कार्यालयात येत नाहीत. त्यांची वाट पाहत दूरवरून आलेले शेतकरी ताटकळत बसून असतात. मात्र, अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा वचक नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची या अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र, हे अधिकारी-कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. नादेड जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असताना लोहा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ही अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. काही क्षेत्रीय कर्मचारी आहेत. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि त्यांच्या वरिष्ठांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र, हे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली कार्यालयातच येत नाहीत. स्वतःची खासगी कामे करत राहतात.



