किनवट, परमेश्वर पेशवे l नांदेड जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील कार्यालयांत कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी नसल्याने व बहुतांश कार्यालयांत प्रभारीराज असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. किनवट अनेक रेल्वे वेळापत्रकानुसार अप-डाऊनचा आजार बऱ्याच विभागांना जडला आहे.


जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या किनवट पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाला कायमस्वरूपी उपअभियंता नाही. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची तीच परिस्थिती तिथे प्रभारी राज आहे. येथे उपविभागीय अभियंता नाही.


कमी जास्त १० कार्यालयात रामभरोसे कारभार गटशिक्षणाधिकारी कार्यालयालाही कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवटला कायमस्वरूपी प्राचार्य नाही. वनविकास महामंडळ वन प्रकल्प विभागाला कायमस्वरूपी विभागीय व्यवस्थापक नाही. उपविभागीय अभियंता पाटबंधारे कार्यालयातही प्रभारीराज आहे. महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता नाही.


उपप्रादेशिक व्यवस्थापकाची आस्थापना किनवट येथे तर त्यांच्याकडे यवतमाळ, धारणी व भंडारा या तीन कार्यालयांचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला कायमस्वरूपी शाखा व्यवस्थापक नाही.

आजघडीला कमी जास्त १० कार्यालयांत रामभरोसे कारभार सुरू आहे. पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या किनवट तालुक्याचे वास्तव पाहता कोणी वाली आहे की नाही ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. शासन व प्रशासनाने लक्ष घ्यावे कार्यालयात प्रभारीराज नको !
प्रत्येक विभागात कायमस्वरूपी अधिकारी असावे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे .


