हिमायतनगर, अनिल मादसवार| संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बैंक पासबुक व मोबाईल क्रमांक सादर करावे. असे आवाहन हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार पल्लवी टेमकर (Tehsildar Pallavi Temkar) यांनी केले आहे.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई सचिव यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी माहे फेब्रुवारी 2025 पासूनचे अर्थसहाय्य केवळ डि.बी.टी. पोर्टलवर Onboard व Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंडळ निहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डाशी मोबाईल क्रमांक (आधार सेंटरवर) लिंक करुन बैंक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर तसेच हयात प्रमाणपत्र यापुर्वी सादर केले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांनी आपली माहिती संलग्न करणेसाठी तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे सादर करावी.

यासाठी मंडळ निहाय तारीख देण्यात आली असून, या वेळेत सबंधित लाभार्थ्यांनी उपस्थित होऊन कागदपत्रे द्यावी. हिमायतनगर येथील लाभार्थ्यांनी दिनांक 30 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सादर करावी. सरसम बु मंडळातील लाभार्थ्यांनी दिनांक 03 फेब्रुवारी 2025 ते 04 फेब्रुवारी 2025 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सादर करावी. तर जवळगाव मंडळातील लाभार्थ्यांनी दिनांक 05 फेब्रुवारी 2025 ते 06 फेब्रुवारी 2025 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सादर करावी.

सदरील माहिती सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र वर नमुद केलेल्या कॅम्पच्या दिनांकावर आपण स्वतः आधार संलग्न मोबाईल सह हजर राहावे. असे आवाहन तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.