नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात “गंमत असते नात्याची” या नाटकाने प्राथमिक फेरीत उत्कृष्ठ सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नांदेड येथील कुसुम सभागृहात ता. २९ रोजी सायंकाळी ७ वाजता या नाटकाचे सादरीकरण झाले. विजय करभाजन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नाटक कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणारे असून, कॉर्पोरेट जीवनशैलीतील ताणतणाव व त्यातून निर्माण होणारे संघर्ष यांवर प्रकाश टाकते. या नाटकाचे निर्माते अनिल पांडे असून, राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले.
रवीशंकर झिंगरे लिखित “गंमत असते नात्याची” हे नाटक आधुनिक जोडप्यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिप, नात्यांतील उदासीनता आणि कौटुंबिक मूल्यांचा संघर्ष यावर केंद्रित असलेल्या या नाटकात करिअर व नात्यांमधील संघर्षाचे परिणाम कसे होतात, हे अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आले आहे.
या नाटकातील भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शरद पांडे यांच्या भूमिकेत किशोर पुराणिक यांनी दमदार अभिनय केला. सुलभा पांडे यांची भूमिका डॉ. सौ. अर्चना चिक्षे यांनी प्रभावीपणे साकारली. वैभव उदास यांनी सागर पांडे यांची भूमिका जिवंत केली, तर अनघा चिटणीस यांच्या भूमिकेत मोनिका गंधर्व यांनी उत्कृष्ट अभिनय केला. नाटकाच्या यशामध्ये तांत्रिक बाजूंनीही मोलाचा वाटा आहे. नेपथ्याची जबाबदारी सिद्धार्थ नागठाणकर आणि मधुकर भगत यांनी समर्थपणे सांभाळली. प्रकाशयोजनेसाठी बालाजी बाबुराव दामुके आणि दिनकर जोशी यांनी प्रभावी कामगिरी बजावली. संगीत त्र्यंबक वडसकर आणि शौनक पांडे यांनी सांभाळले. रंगभूषा प्रभाकर जोशी आणि संतोष चिक्षे यांनी केली.
तर वेशभूषा सौ. निता जोशी आणि आयुषी चिक्षे यांनी अत्यंत कुशलतेने साकारली. रंगमंच व्यवस्था प्रकाश ढोले, रमाकांत कुलकर्णी, बंडू जोशी, आणि सचिन आडे यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कौटुंबिक नातेसंबंध व आधुनिक काळातील जोडप्यांचे प्रश्न यांवरील या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात विचारांची खळबळ निर्माण केली. नाट्यप्रेमींनी नाटकातील सादरीकरण, विषयाची मांडणी, आणि तांत्रिक बाजूंना भरभरून दाद दिली. “गंमत असते नात्याची” या नाटकाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी समन्वयक किरण चौधरी व त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.