नांदेड| श्यामनगर नांदेड येथील शासकीय स्री रुग्णालयात प्रसृती व उपचारासाठी येणाऱ्या स्री रुग्णांना विशिष्ट मेडिकलच्या चिठ्ठ्या देऊन महत्वाची औषधी बाहेरुन खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. इथे सगळे कांही फुकट आहे मग बाहेरुन औषधी खरेदी केली तर काय बिघडते ? अशी मुक्ताफळे वरुन उधळण्यात येतात.
शासकीय रुग्णालयासाठी शासन करोडो रुपयांची औषधी खरेदी करते, मग ती औषधी कुठे जाते ? ती कुणाला वाटप होते ? यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही ? याचे कांही ताळतंत्र लागेना. याची कुठे तक्रार करावी तर वरिष्ठ अधिकारी आणि डाॅक्टर्स नेहमी गायब असतात. सर्व कांही नविन, शिकाऊ आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या हवाली या स्त्री रुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालत असतो.
नवजात अर्भकांसाठी नियमित लागणारे साहित्य, किट रुग्णांना दिले जात नाही. बाळासाठी लागणारे डायपर व सर्व आवश्यक साहित्य बिनधास्त बाहेरुन खरेदी करण्यास सांगण्यात येते. स्री रुग्णाजवळ काळजी घेण्यासाठी तिची एखादी नातेवाईक महिला असते, तिला औषधी खरेदी करण्यासाठी बाहेर पाठविण्यात येते व चिठ्ठीवर नाव असलेल्या विशिष्ट मेडिकल दुकानातूनच औषधी खरेदी लागते !
नांदेडच्या स्री रुग्णालयात स्टेशनरीचा तुटवडा आहे काय ? विशिष्ट मेडिकल दुकानाच्या चिठ्या देऊन त्यातही कट प्रॅक्टीस करण्यात येते की काय ? याची कुणी जबाबदार अधिकारी चौकशी करुन गोरगरीब रुग्णांचे रोज होणारे शोषण थांबवतील काय ?