राज्यामध्ये विधान सभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात विधान सभेसोबत लोकसभेची पोटनिवडणुकही होत आहे. जिल्ह्यात ९ मतदार संघात विधान सभेची निवडणूक होत असली तरी सर्व मतदारांचे लक्ष नांदेड लोकसभा, भोकर आणि नांदेड उत्तर या मतदार संघाकडे लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने यावेळी चाणाक्षपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निकालाची सर्वानाच उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागल्याने आता विधान सभा निवडणुकीत काय होणार ही उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे. नांदेडमध्ये विधान सभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपामध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यात आजवर काँग्रेस पक्षाची धुरा चव्हाण घराणे वाहत आले. चव्हाण म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच चव्हाण असे समिकरण जिल्ह्यात होते. त्यामुळे अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाचे काय होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. परंतु प्रकृतीने जर्जर झालेल्या वसंतराव चव्हाणांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले. दुर्देवाने वसंतरावांचे निधन झाल्याने त्या विजयाचा आनंद काँग्रेसला फार काळ उपभोगता आला नाही. त्यामुळे विधान सभे सोबतच लोकसभेची निवडणूक घेतली जात आहे.
या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षश्रेष्ठीसमोर निवडणूक जिंकणे यासोबतच पक्ष सोडून गेलेल्या अशोक चव्हाणांना शह देणे हाही उद्देश होता. त्यामुळे निवडणुकीची उमेदवारी देताना काँग्रेसने चाणाक्षपणे उमेदवार उभे केले. वसंतराव चव्हाणांचा अकाली मृत्यू झाल्याने त्याची सहानुभूती मिळावी म्हणून काँग्रेसने त्यांचेच सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. परंतु ती देताना लोकसभा मतदार संघातील जातीय समिकरणाचा फायदा व्हावा याकडेही लक्ष दिले. लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मते मराठा समाजाची आहेत. त्या पाठोपाठ मुस्लीम समाजाची मते आहेत. मुस्लीम मतेही काँग्रेसलाच मिळावी या हेतुने काँग्रेस पक्षाने नांदेड उत्तर मतदार संघातून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल ४० वर्षानंतर काँग्रेस पक्षाने मुस्लीम उमेदवार उभा केल्याने त्यांच्यात उत्साह असणे स्वाभाविक आहे. याचा काँग्रेसला निश्चित लाभ मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी डाँ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. ते स्वच्छ चारित्र्याचे, सुशिक्षित आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तेही मराठा समाजातील आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे काम आहे. त्यामुळे एका अर्थाने ही लढत चांगली होणार आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणे, मराठा आरक्षण आदिंचा जो फटका महायुतीला बसला तसे वातावरण आता नाही. परंतु रवींद्र चव्हाणांच्या मागे असलेली सहानुभूतीची लाट, मुस्लीम मतांचा पाठिंबा, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे महायुतीपासून दूर गेलेली मते याबळावर रवींद्र चव्हाणांचे पारडे आज तरी जड दिसत आहे. अशोक चव्हाणांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डाँ. मिनल खतगावकर यावेळी नायगाव विधान सभेची निवडणूक लढवित आहेत. भास्करराव पाटलांना एक मोठा वर्ग या मतदार संघात आहे. त्याचा फायदा रवींद्र चव्हाण यांना होणार आहे. तथापि महायुतीला ही जागा जिंकायची असेल कठोर परिश्रम करावे लागतील आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यत घेऊन जावे लागेल. केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता यासोबतच सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा फायदा संतुकराव हंबर्डे यांना होणार आहे.
भोकर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. भोकर हा चव्हाणांचा पारंपारिक मतदार संघ आहे. पवारांची जशी बारामती तसा चव्हाणांचा भोकर मतदार संघ आहे. शंकरराव चव्हाणापासून या मतदार संघाने चव्हाण घराण्याचा झेंडा विधान सभेत फडकवत ठेवला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच या निवडणुकीत श्रीजयाच्या माध्यामातून मतदारांना सामोरे जात आहेत. काँग्रेसने जातीय समिकरण लक्षात घेऊन या मतदार संघात तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे. कोंढेकर यांचे नातेसंबंध देशमुखांशी आहेत. अर्धापूर, बारड हा भाग मराठा देशमुखांनी व्यापलेला आहे. हेच पप्पू पाटील यांचे शक्तीस्थान असल्याचे मानले जाते. श्रीजया देशमुख या जरी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरल्या असल्या तरी खरी परीक्षा अशोक चव्हाणांचीच आहे.
अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी काँग्रेस यावेळी जोरकस प्रयत्न करणार यात संशय नाही. निवडणुकीच्या राजकारणात अशोक चव्हाण मातब्बर आहेत. स्वतःच्या शिक्षणाचा त्यांनी राजकारणातही योग्य उपयोग करुन घेतला आहे. मतांचे गणित मांडताना ते मायक्रो मँनेजमेंट करतात. त्यांनी काँग्रेस जरी सोडली असली तरी केंद्र आणि राज्यातील सरकार त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे आपल्या मुलीला विजयी करण्यात अशोक चव्हाणांना परिश्रम लागतील परंतु श्रीजया विधान सभेत पोहोचतील अशी चर्चा आहे. स्वतः श्रीजया चव्हाण या कोरी पाटी आहेत. त्यांच्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नाही. अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण यांची पुण्याई त्यांच्या पाठिशी आहे.
नांदेडवासियांचे सर्वाधिक लक्ष नांदेड उत्तर मतदार संघाकडे लागले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साडेतीन लाख मतदार असलेला हा एकमेव मतदार संघ आहे. काँग्रेसने यावेळी माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लीम समाज आजवर काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. मकबूल सलिम यांच्यानंतर अनेक वर्षानी अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर उभे आहेत. ही लढत दुहेरी झाली असती तर बालाजी कल्याणकर सहज निवडून आले असते. परंतु या मतदार संघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिल्यानंतरही उध्दव ठाकरे यांनी संगिता पाटील डक यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील ही बंडखोरीच आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक मिलींद देशमुख यांनीही याच मतदार संघात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे बालाजी कल्याणकर, संगिता पाटील डक व मिलिंद देशमुख या तिघात होणा-या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांना होणार आहे.
या मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारात होणारे मत विभाजन हेच काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांच्या विजयाचे गमक ठरणार आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या विजयासोबतच जातीय समिकरणाचा सूक्ष्म अभ्यास करुन ज्या उमेदवा-या बहाल केल्या त्याचा फायदा या निवडणुकीत कोणाला होतो याकडेच सर्वाचे लक्ष आहे. राज्यातील राजकारणाची सध्या अशी स्थिती आहे की, कोणत्या मतदार संघातून कोण विजयी होईल याचा अंदाज भल्याभल्यांना लावणे अवघड झाले आहे. त्याप्रमाणेच आज आहे तशीच परिस्थिती उद्या राहील याचाही काही भरवसा राहिला नाही एवढी अस्थिर परिस्थिती झाली आहे. तथापि नांदेड लोकसभा, भोकर, नांदेड उत्तर या तीन मतदार संघात होणा-या जय-पराजयाचे जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळेच नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला दिशादर्शक ठरणा-या या तीन मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड
दि. १०.११.२०२४, मो.नं. ७०२०३८५८११