मुंबई| राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते 19 ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 98 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.
सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यानुसार राज्यातील शासकीय जागेतील 2 लाख 42 हजार 634, सार्वजनिक जागेतील 2 लाख 79 हजार तर खाजगी जागेतील विनापरवाना 1 लाख 83 हजार जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये भिंतीवरील पेंटींग, पोस्टर, बॅनर, कटआऊट, फ्लेक्स इत्यादींचा समावेश आहे तसेच विनापरवाना जाहिरातींवर कारवाई सुरु असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 14 कोटी 90 लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.कोणत्याही कल्याणकारी योजनांचे नवे लाभार्थी निवडता येणार नाहीत, नवी योजना जाहिर करता येणार नाही तसेच कल्याणकारी योजनांकरिता निधी वाटपाबाबत निवडणूक आयोगाची परवानगी बंधनकारक असल्याचे सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.