मुंबई | महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे, जागा वाटपाची ही चर्चा एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व महाविकास आघाडीची प्रकृत्तीही उत्तम आहे असेही चेन्नीथला यांनी सांगितले.
प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर सकाळी भेट घेतली त्यावेळी त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांच्याबरोबर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शिवसेना खा. संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दुपारी टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ना पटोले म्हणाले की, महायुतीचा चेहरा कोण आहे त्यांनी जाहीर करावे असे आम्ही सातत्याने विचारत होतो पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूत च्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपाचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूत सह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत.
पांचज्यन या आरएसएसच्या मुखपत्रात बाबा सिद्दीकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दाऊद असो किंवा देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दीकी आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही. आता बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपाला चालते. भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसच्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक दुपारी टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सिताक्का, टि. एच. सिंग देव, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा. नासीर हुसेन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, वॅार रूमचे प्रमुख वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.