नांदेड| जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व डिजीटल उपकेंद्र नांदेड येथे भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे ग्रंथपाल रविंद्र लाठकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे तसेच त्यांच्यावर आधारित ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. डॉ.कलाम यांनी विज्ञानाची कास धरत आधुनिक भारताचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनभर परिश्रम केले. मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा हा यशाचा मंत्र युवा पिढीला दिला.
तसेच जागतिक विद्यार्थी दिवस हा त्यांचा 15 ऑक्टोंबर जन्मदिवस म्हणून भारतभर पाळला जातो. पुस्तकांचा लळा आयुष्यभर बाळगणारा या महान व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्त अभ्यासिकेतील सर्व स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हावेत म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यंवशी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयक ग्रंथाचा संच भेट दिला. यावेळी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हावेत म्हणून ग्रंथपाल रविद्र लाठकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ.रा.वट्टमवार, बाळु पावडे, श्री. पाटील, मुंजाजी घोरपडे तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.