किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी बहुल भागासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवासह गाव वाडी तांड्यावर विविध योजना कशा राबवता येतील व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट माहूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व माहूरचे तहसीलदार केशव यादव यांच्यासह किनवट माहूर तालुक्यातील सर्व विविध विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक किनवट तहसील कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीत आदिवासी विकासाच्या उपाययोजना व आरोग्य विभाग, शैक्षणिक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी बांधकाम विभाग,लघु सिंचन पाटबंधारे विभाग, वन विभाग,नगर पालीका, पंचायत समिती व कृषी विभाग,व शेतकऱ्याच्या पीक विम्यासह अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या नुकसानी बाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आढावा घेतला, त्याचबरोबर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान कसे मिळवून देता येईल यासाठी शासनाकडे लवकरात लवकर नुकसानी बाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी माहिती दिली.