पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ लक्ष्य ‘ या नृत्य विषयक कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.


हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेने सादर केला.शनिवार,दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमामध्ये डॉ. अनुपमा कैलाश ( कुचीपुडी ), पूर्वा शहा ( कथक ), राधिका मुळये (भरत नाट्यम् ) यांनी ३ शास्त्रीय नृत्यप्रकार एकल ( सोलो ) स्वरूपात सादर केले.पूर्वा शहा यांनी दुर्गा स्तुती ने प्रारंभ केला.ताल धमार, ततकार , बंदिश ,चक्री, ठुमरी हे कथक मधून प्रस्तुत केले.


अनुपमा कैलाश यांनी कुचीपुडी नृत्यातून कृष्णाच्या रूसलेल्या विरहिणीची अनोखी रुपे प्रस्तुत केली. राधिका मुळये यांनी भरतनाटयम् मधून ‘यती ‘ सह अनेक बहारदार नृत्ये सादर केली.

नृत्य गुरू मनीषा साठे, डॉ.सुचेता भिडे – चापेकर, सुचित्रा दाते , भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे, रसिका गुमास्ते आदी मान्यवर उपस्थित होते. नृपा सोमण यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४७ वा कार्यक्रम होता.
