छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जिल्हानिहाय निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.


विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत निर्भय, पारदर्शक व शांततामय मतदान प्रक्रिया पार पडेल, तसेच मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास आयुक्त वाघमारे यांनी व्यक्त केला. मतदारांमध्ये मतदानाबाबत अधिक व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या आढावा बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सुर्या कृष्णमुर्ती, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे संजयसिंह चव्हाण, लातूरच्या वर्षा ठाकुर-घुगे, धाराशिवचे किर्ती किरण पुजार, पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. काही वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांचे कौतुक करत, इतर जिल्ह्यांनीही मोठ्या प्रमाणात असे उपक्रम राबवावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व दिव्यांग मतदार यांना मतदान सुलभ व्हावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

मतदार यादीतील दुबार नोंदी कमी करण्यासाठी संबंधित मतदारांकडून संमतीपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया गांभीर्याने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आचारसंहिता कालावधीत होणाऱ्या कारवायांची माहिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले.

‘म्हैसूर शाई’चा वापर – यावेळी आयुक्त वाघमारे यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मध्ये लोकसभा–विधानसभा निवडणुकीप्रमाणे ‘म्हैसूर शाई’चा वापर करण्यात येणार आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त – निवडणूक प्रक्रिया भयमुक्त पार पडावी यासाठी संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त, सीमा भागात नाका बंदी, अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई, भरारी व स्थिर पथकांची तैनाती करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मतदान व मतमोजणीच्या दिवशी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, याची खात्री देण्यात आली.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान केंद्रे, ईव्हीएम उपलब्धता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्ट्राँगरूम सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेबाबतची तयारी स्पष्ट केली. निर्भय, निष्पक्ष आणि लोकशाही मूल्यांना बळ देणारी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्धार यावेळी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

