हिमायतनगर,अनिल मादसवार| सिरंजनी बायपास रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने सिरंजनी, एकंबा,कोठा येथील युवकानी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत रस्त्यावर वृक्ष लावून आमदार खासदार व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. तात्काळ या रस्त्याची नोंद घेऊन कायम समस्या सोडवावी अन्यथा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत राजकीय नेत्यांचा दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
हिमायतनगर आद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून सिरंजनी, एकंबा, कोठा गावाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन रस्ता जीवघेणा बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाच्या बसला चिखलातून जाणे येणे करणे अवघड झाले आहे. पावसामुळे तर अक्षरशः बस बंद पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचार करून सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली होती. मात्र रस्त्याच्या दोन्ही तोंडावर चुरींच्या काही गाड्या टाकून राजकीय नेते मोकळे झाले असले तरी रस्त्याची जीवघेणी अवस्था जैसे थेच आहे.
रस्त्याच्या कटकटीला कंटाळून सिरंजनी बायपास रस्त्यावरील चिखलात वृक्ष लावून शासन, प्रशासन व राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणाचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध केला आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मानव विकास मिशन बसचा अडथळा तात्काळ दूर झाला नाहीतर आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम राजकीय नेत्यांना भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच शासनाने जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी रहदारीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना युवकांनी सिरंजनी बायपास रस्त्याची नोंद कोणत्याही विभागाकडे नाही असे समजल्याने सांगत संताप व्यक्त केला…. या सहा गावात लोक राहत कि नाही… याचं राजकीय नेते व शासनाला काही देणंघेणं नाही… गेल्या २५ कुणीच दाखल घेतली नाही… रस्त्याची नोंद कुठं करायची सर्वसामान्य नागरिकांना काही माहित नाही… हे काम आमदार खासदाराचे नव्हे काय..? मग जनतेसाठी ते काय करतात… या जीवघेण्या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आणि होत आहेत… अनेकजण घरी खात पकडून आहेत….याच कोणालाही सोयरंसुतक नाही… रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत… आता रस्त्यामुळे एखादी व्यक्ती मेल्यानंतर शासन दखल घेणार का…? असे नाना प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार करत युवकांनी गांधीगिरी मार्गाने दुर्लक्षित कारभाराचा निषेध केला आहे.
नुतकेच सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी सिरंजनीच्या जागरुक नव युवकांस सोबत घेऊन या अंतर्गत रस्त्याची डागडुजी आठ दिवसापूर्वी केली होती. त्यामुळे बस जाण्यायेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र या रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडून येताना संपूर्ण रस्त्यात केवळ दोन ट्रैक्टर चुरी टाकल्याने आता मोठी नालीचा निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी नागरिकांना व महामंडळ बसेसला जाणेयेणे कठीण बनले आहे.