नांदेड/पुणे| नांदेडचे भूमिपुत्र तथा यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी दुसऱ्यांदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड या विद्यापीठाची ‘लोकप्रशासन’ या विषयात एचडी पदवी प्राप्त केली आहे.


डॉ. बबन जोगदंड यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी राज्यातील कार्यरत अधिकारी वर्गात सर्वाधिक पदव्या, पदविका मिळवण्याचा मान मिळवला आहे. आतापर्यंत त्यांनी २५ विषयात पदवी, पदविका मिळवल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ६ विषयात एम.ए. केले आहे. त्याचबरोबर एलएलबी, एमबीए, एम.एस्स.सी.(मानसशास्त्र), एम.एम.सी.जे. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम अशा महत्त्वपूर्ण पदव्या प्राप्त केल्या आहेत. देगलूर महाविद्यालय देगलूर येथील लोकप्रशासन केंद्राचे विभाग प्रमुख संशोधक डॉ. बालाजी कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकप्रशासन’ या विषयात ‘महाराष्ट्राच्या लोकप्रशासनात यशदाचे योगदान’ या विषयात संशोधन करून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. तो मान्य होऊन त्यांना ही दुसरी पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.


यापूर्वी त्यांनी पत्रकारितेत २०१३ मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. आता दुसऱ्यांदा त्यांना ही पीएचडी प्राप्त झाली आहे. डॉ. बबन जोगदंड यांना शिक्षण घेण्याचा छंद आहे. त्यांनी एकही वर्ष शिक्षणात खंड पडू दिला नाही. ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील रहिवासी आहेत. गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या व महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या’ यशदा’ या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये ते अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यशदाच्या लोकप्रिय असलेल्या ‘यशमंथन’ या मासिकाचे संपादकही आहेत. यापूर्वी त्यांनी पत्रकारितेमध्ये दहा वर्ष काम केले आहे. पत्रकारितेच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या परीक्षेत त्यांनी ‘संपादकीय लेखन’ या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने त्यांना त्यावेळी पीजी रांजणीकर पारितोषिक मिळाले होते.

त्यांचे राज्यात कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांना आतापर्यंत देश -विदेशात शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मा.राज्यपालांच्या हस्तेही त्यांना दोन वेळा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्यशासनाच्या डॉ. आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समिती व बालभारतीचेही ते सदस्य आहेत. तसेच विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांच्या अभ्यासक्रम मंडळावरही ते सदस्य म्हणून कार्यरत होते.

त्यांचा राज्यात प्रचंड जनसंपर्क असून त्यांच्यावर ‘मानवी संबंधाचा बादशहा’ असे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यामध्ये राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यासंबंधी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. बबन जोगदंड हे उत्तम वक्ते, लेखक, संशोधक, अभ्यासक, सूत्रसंचालक व चळवळीतील कार्यकर्तेही आहेत. त्यांची आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित असून त्यानी अनेक ग्रंथांचे संपादनही केले आहे. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्यानेही दिली आहेत तसेच ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करतात. त्यांनी ‘लोकप्रशासन’ या विषयात दुसऱ्यांदा पीएचडी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.