लोहा,प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, आता या दोन राजकीय कुटुंबांच्या तिसऱ्या पिढीत पुन्हा स्नेह आणि समन्वयाचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात या घडामोडीची चर्चा रंगली आहे.


मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ डॉ. शंकरराव चव्हाण आणि शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्यात साडेतीन दशकांहून अधिक काळ कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. दोन्ही कुटुंबांमध्ये सण-उत्सवांच्या निमित्ताने येणे-जाणे होते. चिखली येथे उन्हाळी सुट्टी आणि दिवाळीच्या काळात गोविंदराव पाटील हे डॉ. शंकरराव चव्हाण यांना आग्रहाने बोलावत असत. कुसुमताई चव्हाण आणि वच्छलाबाई गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्यातही जिव्हाळ्याचे संबंध होते.


मात्र, पुढच्या पिढीत हेच कौटुंबिक संबंध राजकीय विरोधात बदलले. अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या दोन दशकांत अधिक टोकदार झाला. असे असले तरी सुख-दुःखाच्या प्रसंगी दोन्ही कुटुंबांतील कौटुंबिक जिव्हाळा कायम राहिल्याचे अनेकदा दिसून आले. कोरोना काळात मे २०२० मध्ये अशोकराव चव्हाण आजारी असताना प्रवीण पाटील यांनी ‘साहेब, लवकर बरे व्हा, आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना’ अशी पोस्ट केली होती.



आता तिसऱ्या पिढीत आमदार श्रीजया चव्हाण आणि जिल्हा बँकेच्या नूतन संचालिका प्रणिताताई चिखलीकर यांच्या माध्यमातून या कुटुंबीय संबंधांना नवा आयाम मिळताना दिसत आहे. दोघीही भाजपमध्ये असून आपापल्या परीने राजकीय वारसा पुढे नेत आहेत. विशेष म्हणजे, दोघींनीही एकमेकींवर राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा वैयक्तिक टीका करण्याचे टाळल्याचे दिसते.

आमदार श्रीजया चव्हाण यांनी मतदारसंघात संघर्षातून आपले स्थान निर्माण केले आहे. विरोधकांवर टीका करतानाही अपशब्द न वापरता सुसंस्कृत राजकारण करण्याची त्यांची भूमिका चर्चेत असते. दुसरीकडे, प्रणिताताई चिखलीकर या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय असून त्यांचा जिल्ह्याच्या विविध भागांत जनसंपर्क असल्याचे मानले जाते. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात या दोन्ही महिला नेतृत्वांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
या नव्या समीकरणाची काही उदाहरणे अलीकडच्या काळात पाहायला मिळाली. प्रणिताताईंनी श्रीजया चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या, तर काहींच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीत दोन्ही कुटुंबातील या तिसऱ्या पिढीतील नेतृत्वाची राजकीय सक्रियता दिसून आली. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही दोन्ही बाजू एकत्र आल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या निवडणुकीपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत दिसून आलेला हा राजकीय समन्वय भविष्यातील नव्या समीकरणांची नांदी ठरणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन दशकांच्या टोकदार राजकारणानंतर चव्हाण-चिखलीकर कुटुंबातील तिसरी पिढी ‘समन्वय’ साधत असेल, तर या बदलाचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.
हा समन्वय केवळ राजकीय गरज म्हणून निर्माण झाला आहे की, जुन्या कौटुंबिक ऋणानुबंधांना पुन्हा उजाळा देणारा ठरणार आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, दोन कुटुंबांतील कटुतेच्या राजकारणाऐवजी तिसऱ्या पिढीत संवाद आणि गोडवा वाढताना दिसत आहे, एवढे मात्र निश्चित.

