नांदेड| शहरातील वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. या भागात खासदार, माजी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठितांचे वास्तव्य असतांना देखील ड्रेनेज लाईन कनेक्शन आणि रस्त्याचे कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांमधून ओरड होत आहे.
शहरातील वसंतनगर भाग सखल भाग म्हणून ओळखला जातो पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या भागात पाणीच पाणी होते गतवर्षी बहुतांशाच्या घरात पाणीच पाणी शिरले होते मात्र यावर्षी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाच्या वतीने याभागात पाणी जमा होणार नाही यासाठी नालीकामास सुरुवात झाली त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरु झाले पावसाळ्याच्या अगोदर ही कामे पूर्णत्वास होणे अपेक्षित असतांना देखील हे काम रखडवण्यातच गुत्तेदारांनी धन्यता मानली अशी परिस्थिती आहे. एक-दोन दिवस काम करायचे आणि नंतर ओरड झाल्यानंतर पुन्हा कामास सुरुवात करायची अशी स्थिती याभागातील आहे.
आता वसंतनगर चौरस्त्यापासून रुपा गेस्ट हाऊसकडे जाणारा रोडवर मागील अनेक दिवसांपासून कामे सुरु आहेत अगोदर नाली काम नंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरु करण्यात आले मात्र याअगोदर खूप ओरड झाल्यानंतर रखडलेली ड्रेनेज लाईनचे कामे सुरु झाली मात्र आता ड्रेनेज लाईन कनेक्शन देण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून तसेच रखडले आहे ड्रनेजे लाईन कनेक्शनच्या कामाचा श्रीगणेशा काही होता होईना अशी परिस्थिती आहे. गुत्तेदाराशी संपर्क साधला असता महापालिकेने खोदकाम करण्यास मनाई केली असल्यामुळे आम्हाला ड्रेनेज लाईन कनेक्शन देता येत नाही असे सांगत आहेत मात्र वसंतनगर चौकातून आनंदनगरकडे जाणाया रोडवर नाली कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे अर्थात यासाठी महापालिकेची परवानगी आहे मग वसंतनगर चौकातून रुपा गेस्ट हाऊस रोडवर ड्रनेजे लाईन कनेक्शन देण्यासाठी खोदकाम करण्यास परवानगी कशी का नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडत आहे.
वसंतनगर भागात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कामांमुळे या भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याअगोदर नाली कामासाठी खोदकाम करण्यात आले आणि नंतर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले यामुळे या भागातील रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. आज घडीला या भागात पाऊस पडल्यानंतर पाणीच पाणी, चिखलच चिखल होत आहे रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यामुळे पाणी साचल्यानंतर डास होत आहेत, घाण वास येतो आहे तर ऊन पडल्यानंतर रोडवरुन स्कूल व्हॅन, कार, बाईक, ट्रक, कार, स्कुल बस आदी रहदारीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.
एकूणच या भागात राहणाया नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाली काम झाले तर मुख्य रस्त्यासह इतर ठिकाणी नालीचे तोंड उघडेच ठेवले आहे यामुळे रोगराईला निमंत्रण दिल्या जात आहे. उघड्या नालीच्या ठिकाणी झाकन लावणे गरजेचे आहे मात्र याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. या भागात जेसीबीने खोदकाम झाले आहे तसेच मोठी जड वाहने, जेसीबी, ट्रकचा वावर झाल्यामुळे रस्ता खचून याठिकाणच्या रहिवाश्यांना इतरही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे जसे की, कोणाला नळाला पाणी येत नाही तर कुठे ड्रेनेज लाईन खचली आहे पाणी बॅक वॉटर मारत आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील वर्षांची प्रापर्टी मागणी बील देखील यावर्षीच देण्यात आले. महापालिकेला टॅक्स कसा मागता येतो तश्या मुलभूत सोई देखील पुरविणे गरजेचे आहे याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
वसंतनगर भागात महापालिका आयुक्त पाऊस पडल्यानंतर किंवा ऐरवी देखील पायी चालत फिरले त्यांना वसंतनगर वासियांची काय समस्या आहे हे कळेल. वसंतनगर भागातील ड्रेनेज लाईन कनेक्शन आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी याभागातील सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. तर दुसरीकडे शहरातील एक श्रध्दास्थान असलेला श्री राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या मुक्तेश्वर आश्रमात सोमवार आणि गुरुवार मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते आता तर श्रावण महिना असल्यामुळे भाविकांची रीघच आहे.
या ठिकाणी देखील आनंदनगर चौक ते महादेव दाल मिल मुख्य रोडपासून श्री मुक्तेश्वर आश्रमाकडे जाणारा रस्ता देखील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम झाल्यामुळे पूर्णतः खराब झालेला आहे. अक्षरशः नागरीकांना खाली बघून चालावे लागत आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत तर पावसात चिखलच चिखल होत आहे तेव्हा हा रस्ता देखील पूर्ण करुन येथील नागरीकांसह भाविकांना त्रास मुक्त करण्याची मागणी होत आहे. वसंतनगर भागात खासदार, माजी खासदार, आमदार यांच्यासह मातब्बर लोकप्रतिनिधी राहतात तरी देखील या भागातील नागरीकांना त्यांच्या समस्यांसाठी त्रास सहन करावा लागत हे विशेष !