हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीकडून वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी प्रभावी निवेदन जारी करत जनतेसमोर आपला विकासदृष्टीचा रोडमॅप मांडला आहे.


जनतेला “मतदानरूपी आशीर्वाद” देण्याचे आवाहन करत शिंदे यांनी निवडून आल्यास वॉर्डाच्या सर्वांगिण विकासाचे वचन देत स्पष्ट केले की वॉर्ड क्रमांक 8 मध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि धार्मिक-सामाजिक स्थळांचे उन्नतीकरण हेच आपले प्रमुख प्राधान्य असेल.

शिंदे यांनी आपल्या घोषणापत्रात पुढील महत्त्वाच्या कामांचा समावेश केला आहे असून, वॉर्डातील सर्व रस्ते गुळगुळीत व दर्जेदार करणार, हिंदू-मुस्लिम स्मशानभूमीचे सुसज्जिकरण व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार, लकडोबा मंदिर परिसराचा सर्वांगीण कायापालट, तुकादेवी व शनि मंदिर परिसराचे सुशोभीकरण, ड्रेनेज लाईनची कायमस्वरूपी समस्या पूर्णपणे दूर करणार तसेच शहराची प्रमुख गरज असलेली पाणीटंचाई संपवून प्रत्येक घरापर्यंत पुरेशा पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणार. जेणे करून “वॉर्डातील कोणत्याही माता-भगिनींना डोक्यावर भांडे घेऊन पाणी आणण्याची वेळ येणार नाही, अशी हमी मी सर्वांना देतो,” असे ते म्हणाले.


विकासाची हमी, सर्वसमावेशकतेचा संदेश आणि स्पष्ट कामाचा अजेंडा यांमुळे वॉर्ड क्रमांक 8 मध्ये या जाहीरनामा घोषणेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या भागातील जनता निश्चितच वॉर्ड क्रमांक 8 चे काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे.


