हदगाव, शेख चांदपाशा| नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले असल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.


कृषिमंत्री भरणे हे हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल अंतर्गत करमोडी परिसरात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारात उभे राहून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “सर्वात जास्त नुकसान वाशिम व नांदेड जिल्ह्यांत झाले आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष असून आम्हालाही त्यांच्या स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात मी प्रत्यक्ष पाहणी केली असून तेथेही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.


आठ ते दहा दिवसांत पंचनाम्यांचे अहवाल सादर होतील. ज्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चित मदत मिळेल. पिकविमा संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांना विम्याचा लाभ निकषानुसार निश्चित मिळणार आहे. यावेळी हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


पालकमंत्री केव्हा येणार?
हदगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेकांचे घर उध्वस्त झाले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पालकमंत्र्यांविषयी नाराजीचे वातावरण आहे.


