हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगाम भरभराटीचा होवो आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्ती मिळावी… अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी दिनी शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला – पुरुष भक्तांनी टाळ – मृदंग आणि विठू नामाच्या गजरात शहराला नगरप्रदक्षिणा घालून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला आहे.
श्रीक्षेत्र असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व कधीमध्ये पाऊस सुरु होतो आहे. अशातही दि.१७ जुलै रोजी आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला – पुरुष, भाविक भक्त, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल रुख्माई आणि श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून येथील श्री परमेश्वर मंदिरात गर्दी केली होती. सायंकाळी परंपरेनुसार गावकरी आणि भजनी मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या नगर प्रदक्षिणा दिंडीला ५ वाजता सुरुवात झाली. दिंडीपूर्वी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अनादिकालापासून चालत आलेली परंपरा राखत विठू नामाचा गजर करीत, टाळ – मृदंगाच्या वाणीत शहरातून नगरप्रदक्षिणा दिंडी काढली.
दरम्यान शहराच्या गावाबाहेरील व शहरातील सर्व मंदिरातील देवी – देवतांचे दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यां भाविकानी घेतला आहे. रिमझिम पावसाच्या सारी आणि ढगाळ वातावरणातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी दिनी नगर प्रदक्षिणा काढण्याची हि परंपरा मागील शेकडो वर्षापासून गावकरी आणि श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पुढाकारातून अविरतपणे सुरु असून, भजन, भावगीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात परत येउन करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक भाविकांकडून केळीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान आषाढी उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक अमोल भागात यांनी बंदोबस्त ठेऊन रस्त्यावरील अडथळे दूर केल्याने भाविकांना श्री दर्शनासाठी येताना अडचण आली नाही.
नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजन
येथील नगरपंचायत अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली खोदून ठेवल्याने शहरातील खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. या खड्डेमय घाण पाण्यात चिखलात रुतलेल्या रस्त्याने नगरप्रदक्षिणा दिंडीला जावे लागले आहे. त्यामुळे दिंडीत सामील झालेल्या महिला – पुरुष भाविकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता तर सण- उत्सवाची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे शहरातील धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण होणार नाही आणि भक्तांना चिखल आणि घाणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी तात्काळ नगरपंचायतीने शहरातील खड्डेमय रस्ते तात्पुरते तरी दुरुस्त करून घ्यावे अशी रस्ता अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.