लोहा/नांदेड| ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील शासकीय व खाजगी अशा एकूण २६ शाळांची तालुकास्तरीय तपासणी व मूल्यांकन प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ही तपासणी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या स्वतंत्र पथकांमार्फत केली जात आहे.


लोहा तालुक्यातील १३ केंद्रांमधून केंद्रस्तरावर पात्र ठरलेल्या शाळांची तालुका पातळीवर तपासणी केली जात असून, यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १३ व खाजगी व्यवस्थापनाच्या १३ अशा एकूण २६ शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी आहेत.

मंगळवारी (दि. २० जानेवारी) लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय व शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या दोन खाजगी शाळांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात आली. ही तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.


या मूल्यांकन समितीत साईबाबा हायस्कूल, मारताळा येथील ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ मोरे, केंद्रप्रमुख संभाजी भूरे (केंद्र मारताळा), जि.प. शाळा, जोशी सांगवी येथील मुख्याध्यापक प्रमोद गायकवाड, तालुका बीईओ कार्यालयाचे संगणक प्रमुख सर्वजित धुतराज यांचा समावेश होता.

मूल्यांकन समितीने शाळेची स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग, शालेय परिसर, शिस्त व सुविधा आदी बाबींची अतिशय बारकाईने व मुद्देनिहाय तपासणी केली.
या वेळी कै. विश्वनाथराव नळगे हायस्कूलचे मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी मूल्यांकन प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले. “या तपासणीमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या असून शाळेत नवोपक्रम राबविण्यास अधिक प्रेरणा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ मोरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे यांनी शाळा प्रशासनाला मौल्यवान अभिप्राय नोंदविला.
‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या उपक्रमामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून, शैक्षणिक गुणवत्ता व शालेय वातावरण अधिक सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र लोहा तालुक्यात दिसून येत आहे.

