हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील मंगरुळू गावातील दोन होतकरू युवकांनी पोलिस दलात निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ज्ञानेश्वर भरत तिगलवाड आणि आकाश रमेश रुद्रबोईणवाड या दोघांची अनुक्रमे पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर पोलिस दलात निवड झाली असून गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या या दोन्ही युवकांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता सातत्याने अभ्यास आणि शारीरिक तयारीवर भर दिला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत हेच मोठे बळ ठरले.

या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण मंगरूळ गावात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. गावकऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युवकांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.


“यश हे नशिबाने नाही तर मेहनतीने मिळते,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी झटावे, असा सकारात्मक संदेश या यशातून पुढे आला आहे.

दरम्यान, दोन्ही युवकांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात असून, भविष्यात ते समाजासाठी उत्कृष्ट सेवा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



