किनवट, परमेश्वर पेशवे| पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली दोन अस्वल दहेली शिवारातील विहिरीत पडली असून, या विहिरीतील एका अस्वलाचा मृत्यू झाला असून, एकाला वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे.


नांदेड जिल्ह्यात घनदाट अरण्य असल्याची ओळख म्हणून किनवट तालुक्याला ओळखले जाते. त्यातच वन विभागाचे पानवटे जंगलामध्ये कुठेही भरून नसल्याकारणाने वन्य प्राण्यांची धाव मानव वस्तीकडे येत आहे. जागतिक वनदिनी इस्लापूर येथील हरीण पठारावर पाण्याच्या भटकंती करत असताना हरणाचा मृत्यू झाला. त्यातच दोन बिबट्याचा शोध मांडवी वन विभागाला लागला नाही.


त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेला अस्वल विहिरीत पडून मरण पावल्याची घटना दिनांक 22 रोजी मांडवी वन विभागात घडली. जिल्ह्याच्या अख्ख्या वन विभागाचे व वाभाडे निघाली म्हणली तरी आता वावगे ठरणार नाही. कारण नांदेड पासून ते किनवट पर्यंत बसलेल्या कुठल्याही वन अधिकाऱ्यांना वनप्राण्या बद्दल आपुलकीच राहिली नाही अशाच प्रतिक्रिया आता किनवट सारख्या दुर्गम भागातील तालुक्यातून ऐकावयास मिळत आहेत.


तालुक्यातील दहेली येथील आकाश आत्माराम कोटरंगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन अस्वल पाण्याच्या शोधात येऊन पडल्याने एका नर जातीच्या अस्वलाचा जागीच मृत्यू झाला . तर दुसऱ्या अस्वलाला बाहेर काढण्यासाठी किनवट मांडवी सह सारखणी पिंपळगाव येथील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत मात्र सकाळी सात वाजता विहिरीत पडलेल्या अस्वलाला सायंकाळी चार वाजेपर्यंत बाहेर काढण्यात वन विभागाला यश मिळाले नाही. चारच्या नंतर मृत अस्वलास बाहेर काढण्यात आले व पाच वाजता रेस्क्यू करून जिवंत अस्वलास बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले .या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.


