हिमायतनगर | संपूर्ण महाराष्ट्रात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाचे औचित्य साधून मौजे सिरंजनी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.


वाढत्या तापमानामुळे आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. यावर उपाय म्हणून झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी व्यक्त केले.


“वृक्ष हीच आपल्या भविष्यासाठीची नवी आशा आहे,” असे म्हणत श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन आणि प्रदूषणावर नियंत्रण यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पवन करेवाड सिरंजनीकर उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार पंगे साहेब, मंडळ अधिकारी चव्हाण साहेब, तलाठी पुरी साहेब (हिमायतनगर सज्जा), शेख साहेब (सिरंजनी सज्जा), सब्बनवार साहेब (पळसपूर सज्जा), विशाल शेवाळकर यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


