श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या अधिकारात अतिक्रमण यासह माहूर देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार व महसुली फेरफारावावत हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचा ठपका माहरचे तहसीलदार किशोर यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर आपल्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी कमिशनिंगचे योग्य नियोजन केले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. तसेच महत्वाच्या बैठकीसही ते गैरहजर राहिले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच माहुरच्या रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या आर्थिक बाबीत अध्यक्ष सचिवांना अंधारात ठेवून वरिष्ठांच्या अधिकारात अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवांची शिस्तभंग केल्यामुळे आपल्याला सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणाही जिल्हाधिकारी राऊत यांनी केली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या दणक्यामुळे निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून तहसीलदार यादव यांच्याबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
“वादग्रस्त निर्णयाचाही ठपका”
मंदिराच्या कामाबाबत वादग्रस्त निर्णय घेत जास्त बिलाचे कोटेशन मागवून कामांचे खैरातीप्रमाणे वाटप केले. यातून अधिकाराचा गैरवापर व आर्थिक अनियमितता केल्याचे दिसून येत आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवर वाळूचे उत्खनन, महसूल फेरफार याबाबतही माहूर तालुक्यातून यादव यांच्याविरूद्ध सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्याचे पुढे आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.