हिमायतनगर (वाढोणा),अनिल मादसवार| “यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे आणि सर्वांच्या घराघरात आनंद, समाधान व समृद्धी नांदो,” अशी विठ्ठल-रुख्मिणी चरणी प्रार्थना करत आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो भाविकांनी श्री विठ्ठल-रुख्मिणी व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्ती केली.


श्रीक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकालापासून आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटे ६ वाजता पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारात विठ्ठल-रुख्मिणीचा अभिषेक सोहळा संपन्न झाला. हा अभिषेक संजय माने यांनी सपत्नीक केला. यानंतर मंदिरात आलेल्या भाविकांना केळी व राजगिऱ्याच्या लाडूंचा प्रसाद वितरित करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार मंदिरातील भजनी मंडळाच्या वतीने भव्य नगरप्रदक्षिणा दिंडीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी मंदिराच्या सभागृहात महिला-पुरुष भजनी मंडळाने हरिनाम संकीर्तन व भजनाचा कार्यक्रम सादर केला.

त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, “विठ्ठल… विठ्ठल…” नामघोष करत शेकडो वारकरी, महिला-पुरुष, बालगोपाल आणि नागरिकांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा दिंडी उत्साहात पार पडली. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


